
माझ्या आठवणीतलं नवरात्र
नवरात्र म्हटलं कि आपल्याला आठवतात गरबा ,दांडिया , दुर्गा पूजा किंवा नवरात्रीचे नऊ रंग. फार फार तर नवरात्राचे उपवास. त्याचा कारण म्हणजे हि सगळी आजकालची मॉडर्न कमर्शिअल सेलिब्रेशन्स आहेत. मीडिया मध्ये त्यांचीच चर्चा असते आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे उत्सवाची धमाल लुटता येते पण माझ्या लहानपणी या सगळया गोष्टींपैकी फक्त दांडिया आणि शारदीय नवरात्र या दोनच गोष्टी मला माहित होत्या.
नवरात्राचे नऊ रंग कोणते ? ते दरवर्षी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे का असतात याच कारण शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला पण मला काही satisfactory कारण सापडल नाही. कुठल्यातरी न्युज चॅनेल ने ८-१० वर्षांपूर्वी हा नवीन ट्रेण्ड सुरु केला आणि मग ट्रेण्ड म्हणून सगळे नऊ दिवस नऊ रंग घालायला लागले.
शेवटी मला अस कळलं कि घटस्थापना ज्या दिवशी होते त्या वारानुसार रंग सुरु होतात आणि त्यानंतर एक ठराविक सिक्वेन्स फॉलो केला जातो. म्हणजे यंदा गुरुवारी नवरात्र सुरु झाल तर गुरुवारचा रंग पिवळा तिथून हा सिक्वेन्स सुरु झाला. आणि मग त्या नंतर हिरवा, राखाडी, केशरी,पांढरा ,लाल,निळा,गुलाबी आणि जांभळा या अनुक्रमाने रंग होते. पण ते तसच का हे मात्र काही मला अजून समजल नाही.
पण माझ्या आठवणीतल नवरात्र मात्र खूपच वेगळ आहे. आता तसं नवरात्र साजर करून आणि त्याचा experience घेऊन पण २०-२२ वर्ष झाली. माझ्या आठवणीतला घटस्थापनेचा दिवस आणि यंदा चा घटस्थापनेचा दिवस किती वेगळा होता. पण अजूनही ती सकाळ,तो दिवस आठवला कि वाटतं थोड आयुष्य रिवाइंड करता आलं असतं तर किती बरं झालं असत नाही ? तस माझं contribution म्हणजे आईला वरच्या कामात मदत करणे एवढंच होतं. पण सहामाही परीक्षेचा अभ्यास न करता ती सगळी काम करायला मला भारीच आवडायचं.
आमचं कोकणातलं एक छान कौलारू टुमदार घर होत. त्यामुळे माझी मुख्य कामं म्हणजे अंगणात आणि तुळशीसमोर सडा घालणे आणि रांगोळी काढणे , दुर्वा वेचून आणणे आणि त्या निवडणे, फुलांचे हार करणे हि असायची. फुलांचा हार करणे हि पण एक प्रोसेस होती . म्हणजे घटाला फक्त झेंडूची फुलंच लागायची. त्यातली एका पाकळीची किंवा लहान अंगणातून काढलेली फुलं हि नुसती वाहायला वेगळी करायची आणि छान गोंडेदार झेंडू हारासाठी वेगळे ठेवायचे.
रोज ९ फुलांचा हार करायचा असे त्यामुळे जर पिवळी आणि केशरी रंगाची झेंडू मिळाली तर alternate रंग घालून खूपच सुंदर हार व्हायचा. आई-बाबांनी , दर्शनाला येणाऱ्या पाहुण्यांनि किंवा गुरुजींनी त्या हाराचं कौतुक केलं कि भारी आनंद व्हायचा. किती छान असत ना आपल बालपण? छोट्या छोट्या गोष्टी पण किती आनंद देऊन जात.
माझ अजून एक आवडतं काम असायच ते म्हणजे विहिरीवरून पिण्याचं पाणी भरणे. आमच्या घरापासून साधारण १/४ किलोमीटर वर रहाटाची विहीर होती. नवरात्रात रोज ३-४ कळश्या पिण्याच पाणी भरणे हे पण माझं काम असायच. एरवी घरकामाची बाई भरत असे पाणी पण नवरात्रात तिला स्वयंपाकघरात प्रवेश नसायचा मग माझा turn. माझ्यासाठी आईने एक खास हलकी कळशी पण आणून ठेवली होती. विहिरीच्या बाजूलाच थोड्या अंतरावर कपडे धुण्याचा चौथरा होता आणि त्याच्या आजूबाजूला सोलिया च्या फुलांची (Ginger Lily) खूप सारी झाड होती. कोकणात पावसाळ्याच्या दिवसात ती फुलांनी नुसती लगडलेली असायची आणि त्याचा सुगंध विहिरीच्या आजूबाजूला दरवळायचा.
Image source : Google images
विहिरीच्या मागे काही अंतरावर एक ओहोळ होता आणि त्या समोर नारळ,अननस , मसाल्यांचे पदार्थ यांची लागवड केली होती. मी कधी कधी दुपारी चेन्ज म्हणून अभ्यास करायला या विहिरी जवळ येऊन बसायचे. पक्षांचे सुंदर आवाज ,नारळाच्या बागेचा आडोसा आणि या फुलांचा सुवास खूप प्रसन्न करून टाकायचा.
Image source : Google images
नवरात्रात एखादा दिवस शाळेला रविवारची सुट्टी यायची पण रोज मनात नसतानाही शाळेला जायला लागायच. पण शाळेत पण आईने केलेला नैवेद्य डोक्यात असायचा. आई मला पोळी भाजी देतच असे डब्यात पण पूर्ण नैवेद्य ताटावर बसून खाण्याची मजा त्या डब्याला कुठे? आणि त्यातूनही माझी सर्वात आवडती “घवल्याची खीर” . आई नवरात्र पूर्वी डबा भरून कणकेचे घवले करून ठेवायची आणि म्हणायची “त्या देव्हाऱ्यातली देवी तर माझी खीर येऊन खाणार नाही पण माझ्या या छोट्या देवीला तरी मनापासून खाऊ दे. रोजचे ४ नैवेद्य असायचे त्या सगळ्या नैवेद्यांवरची खीर मी एकटीच खात असे .
बाबांचा ९ दिवस उपवास असायचा. तेंव्हा त्यांना उपवासाचे पदार्थ खाऊन उष्णता होऊ नये म्हणून आई रोज रात्री ड्राय फ्रुटस भिजत घालत असे आणि सकाळी चहा ऐवजी बाबाना ड्राय फ्रुटस चं दूध द्यायची. माझा उपवास नसला तरी ते दूध मला फार आवडायचं.
९ दिवस अखंड ज्योतीचा नंदादीप असायचा. त्या नंदादीपाची वात बनवणं हे पण एक फार स्किलफुल काम होतं. मी कळत्या वयात आल्यावर मला ते काम पण आईने सोपवलं.
घटस्थापना आणि खंडेनवमी ला सवाष्ण ब्राह्मण , पंचमी ला कुवारणी असं नवरात्रात रोज कोणी ना कोणी तरी जेवायला असायचच. आई सप्तमीला देवीच्या देवळात जाऊन ओटी भरायची आणि अष्टमीला कडाकण्या करून त्यांचा हार घटाजवळ बांधायची. ती प्रथा का आहे ते मात्र मला अजून माहित नाही. दुसऱ्या दिवशी नवरात्रीची उत्तरपूजा झाली कि मग त्या कडाकण्या खायला मात्र खूप आवडायच्या.
एक ना दोन नवरात्राच्या असंख्य आठवणी अजून माझ्या स्मृतीत जिवंत आहेत. त्यावेळी आजच्या सारखे स्मार्टफोन्स असते तर ते सुंदर दिवस कॅमेऱ्यात कैद करून ठेवता आले असते.तसे ते माझ्या मनाच्या कॅमेऱ्यात permanently saved आहेतच पण तुम्हाला दाखवायला आज या शब्दांचा आधार घ्यावा लागला.बघा तुम्हाला दिसतंय का माझ्या आठवणातील नवरात्र !
तुमच्या आहेत का अशा काही आठवणी ? मला comment आणि reply करून नक्की सांगा. तुम्हाला माझे पोस्ट्स आवडले असतील तर माझ्या ब्लॉग ला नक्की subscribe करा