गणपती बाप्पा मोरया

“पूजा, तुला आलाय का एव्हाईट कुलकर्ण्यांकडून ? “
“कशासाठी रे? कोणाचा माइलस्टोन बर्थडे आहे का ?”
“ अगं नाही .. गणपतीच्या आरतीसाठी .. “
“अरे बापरे ऑलरेडी गणपतीचं प्लांनिंग सुरु झाल का? मला लक्षातच आलं नाही यंदा .. कधी येतोय बाप्पा ? थांब कालनिर्णय बघते पटकन ! “
“अरे आत्ताशी जुलै संपतोय आणि गणपती सप्टेंबर च्या सुरुवातीला आहे.. पण अरे एकच वीकएंड येतोय गणपतीच्या आठवड्यात ..”
“आणि एक संध्याकाळ तर आरती साठी गेली कि .. आपण सुध्दा लवकर प्लॅन करायला पाहिजे रे .. नाहीतर सगळ्या आरत्या ओव्हरलॅप होतील आणि लोकांची धावपळ होईल कुठे कुठे जाणार ते घरातल्या गणपतीचं करून ! “
“बरं झालं आज या एव्हाईट मुळे वेक अप कॉल मिळाला आपल्याला !”


करोना पूर्व काळात,गेले कितीतरी वर्ष आम्हा उभयतांमध्ये जुलै – ऑगस्टच्या सुमारास होणारा हा नेहमीचा संवाद ! मग यानंतर आमच्यासारखाच विचार करणारे आमचे स्नेही आणि आम्ही असे १५-२० एव्हाईट आणखी पाठवतो आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल साऱ्या ऑस्टिनकरांना लागते. मुलांच्या समर व्हेकेशन संपून याच दरम्यान नुकताच नवीन वर्ग सुरु झालेला असतो त्यामुळे त्यांची नवीन वेळापत्रकं , स्कूल सप्प्लाइज , काही नवीन काही जुने वर्ग मित्र आणि शिक्षक या सर्व गोष्टींशी जुळवून घेण्याची लगबग सुरु असते … त्यातच आता समर व्हेकेशन संपायच्या आत या मुलांच्या कडून गणपती मखर किंवा किमान आरास करण्याची थोडी तयारी करून घ्यायची असते. ऑफिसमध्ये तर सगळे पूर्ण वर्षात करणार नाहीत तेवढ्या जोमाने काम करू लागतात कारण ते नुकतेच एक मोठी सुट्टी एन्जॉय करून आलेले असतात .

आम्हा बायकांचे व्हाट्सऍप मेसेजेस सुरु होतात .. कशासाठी ? अहो ती तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते .. गणपती उत्सव ही तर वर्षातली आमची हक्काची वेळ मराठमोळं नटण्यासाठी .. आमच्या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये आम्ही काय काय ठरवतो हा एक वेगळा लेख होईल पण कोणाच्या आरती ला कुठल्या प्रकारची साडी नेसायची हा एक मेन पॉईंट असतोच. मग संक्रांतीच्या हळदी कुंकवानंतर क्लोझेट मध्ये लपलेल्या साड्या ,ब्लॉउज आणि परकरांना हवा लागते .. त्यातले अर्धे ब्लॉउज होत नसतात मग ज्या साड्या नेसायच्या आहेत त्यांच्या ब्लॉउज च रिपेअरिंग सुरु होतं. किती वेळखाऊ काम आहे ते पण आता ठरवलंय ना मग तशाच साड्या नेसायच्या . एखाद्या वर्षी जर भारतात जाऊन आलो असू तर मग चंगळच ! कारण साड्या आणि ज्वेलरी चा नवीन स्टॉक असतो मिरवायला…


हे सगळं होईपर्यंत गणपती उत्सव आठवड्यावर येऊन ठेपतो आणि मग घाई सुरु होते खऱ्या प्लांनिंगची. सगळ्यात मोठी तयारी म्हणजे आरतीचा महाप्रसाद .. जवळ जवळ १५०-२०० लोकं असणार आहेत प्रसादाला मग सगळं कसं व्यवस्थितच असायला हवं ! यंदा आपण काहीतरी वेगळा मेनू ठेवू अशा कल्पनेने सुरु झालेला आमचा (वि) संवाद अखेर पुन्हा त्याच मेनू वर संपतो.


“पुरणपोळी मुंबईमधून येईल का २ आठवड्यात ?”
“हो येईल कि .. गेल्या वर्षी नाही का आली होती ! “
“पण यंदा पाऊस जोरदार आहे. कस्टम्स मध्ये उशीर झाला किंवा खराब झाली तर ? “
“नाही होणार गं”
“ठीक आहे मग गोडाचं ठरलं तर मग” “बाकी सगळं स्वाद मध्ये ऑर्डर करू” “आणि वरण भात कोशिंबीर घरात. ” Done
“अरे हो .. टेबल आणि खुर्च्या पण ऑर्डर करायच्या आहेत ना रेंटल कंपनी कडे ? नाहीतर ऐनवेळी म्हणेल अव्हेलेबल नाहीत म्हणून”
“पण पूजा वेदर बघितल आहेस का? गेल्या वर्षी सारखा धो धो पाऊस आला तर ?? काय गोंधळ झाला होता आठवतंय ना ? “
” हो खरंच .. सध्या तरी २०% आहे चांसेस ऑफ प्रेसिपिटेशन तो गणपती बाप्पा करून घेईल सगळं ! ऑलरेडी १७० आर एस व्ही पी आल्या आहेत. टेन्शन येतय रे.. “
“अगं आत्ताच म्हणालीस ना गणपती बाप्पा करून घेईल सगळं !”


अस म्हणता म्हणता हरतालिकेचा दिवस येतो आणि आरास ,रांगोळी सगळं करता करता बाप्पाना आणायची वेळ कधी येते कळतच नाही. मग वर्षभर पिशवीत घालून ठेवलेली गांधी टोपी निघते.


“१ २ ३ ४ गणपतीचा जयजयकार ” असं म्हणत मोठ्या थाटामाटात बाप्पा घरातल्या चौरंगावर विराजमान होतात. घरात जणू काही एक नवीन चैतन्य आल्यासारखा वाटतं. घरातला खालचा मजला प्रसन्न आणि स्वर्गीय वाटायला लागतो … झोपायच्या आधी उद्या कोणाकोणाकडे आरती ला जायचा आणि ते कुठल्या वेळी जायचं याचा आराखडा बाप्पा समोर बसूनच मंडल जातो .. कुठे, किती वेळ आरती असेल तिथून दुसऱ्या ठिकाणी जायला किती वेळ लागेल हे सगळं गुगल मॅप वर बघून ठेवल जातं.


गणपती चा दिवस तर माझ्या मते वर्षातला सगळ्यात ऊर्जेचा आणि प्रसन्न दिवस असतो. तोरण , हार, फुल , उदबत्ती, धूप ,कपूर सगळं सगळं कसं एकदम हेव्हनली ! अमोलचा तिथीने वाढदिवस पण याच दिवशी असतो त्यामुळे त्याच्या वाढदिवसाचा मेनू नेहमी गणपती बाप्पाचा आवडता मेनू .. उकडीचे मोदक , बटाट्याची भाजी, कोशिंबीर, वरण-भात आणि सगळ्यात आवडत्या उकडीच्या तिखट फाऱ्या .. दरवर्षी आजींच्या हातच्या फाऱ्याची आठवण काढून अमोल मी माझ्या परीने केलेल्या फाऱ्या मनापासून खातो. एवढ सगळं होईपर्यंत माझी बॅटरी मात्र पूर्णपणे डाउन झालेली असते पण लवकरच आरती मॅरेथॉन सुरु होणार असते आणि थोडावेळ बसून मी माझ्या पहिल्या दिवसाच्या साडी तयारी ला लागते.
माझी वाट बघत अमोल आपली झांज गळ्यात घालून गाडीत बसतो आणि खऱ्या अर्थाने सुरु होतो आमचा गणेशोत्सव … रोज किमान २-3 घरी तरी आरती असते.. अगदी वीक डे मध्ये सुद्धा ! पण सगळे बाप्पाच्या उत्सवात तल्लीन असतात. प्रसादाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी मैत्रिणींबरोबर गप्पा मारत मारत जेवण होत. आणि मग साडी पिक्चर्स आणि सेल्फीज तर आहेतच.


या सगळ्या दिवसात जो सर्वात जास्त गडबडीचा दिवस असतो तो म्हणजे घरच्या आरतीचा .. दरवर्षी येत असला आणि पार पडत असला तरी आदल्या २ रात्री झोप फारशी लागताच नाही. काही विसरत नाही ना? सगळ्यांची व्यवस्था नीट होईल ना? घर साफ झालय ना? जेवण नीट आणि वेळेवर येईल ना? एक ना दोन कित्येक चिंता सतावत असतात पण गणपती बाप्पा सगळं नीट करवतो आणि वर्षातला एक मोठा सोहळा पार पडतो.. एव्हाना ४-५ दिवस झालेले असतात आणि घरच्या बाप्पाला निरोप द्याची वेळ येते .. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत घराच्या बाप्पाला निरोप दिला तरी लगेच कुठेतरी आरती ला जायचा असतंच .. पण जेंव्हा रात्री त्या आरत्या संपवून घरी येतो आणि बाप्पाच्या टेबलावर अंधार बघतो तेंव्हा एकदम पोरकं झाल्या सारख वाटतं !


“अरे बाप्पा गेला कि आपल्या घरी .. आपण नीट केलं ना रे सगळं? कि आपल्या गडबडीत काही राहून गेलं ?”
” या ५ दिवसात क्षणभर उसंत नाही मिळाली त्याच्या समोर बसायला.. चुकलंच बघ. ” नकळत डोळ्यात पाणी तरळून जातं
” अगं पण बाप्पा आहे कि इथेच देव्हाऱ्यात .. जा गप्पा मार त्याच्याशी मनसोक्त.. “
” आणि तोच आहे ना आपल्या सगळ्या चुका माफ करणारा.. तूच म्हणतेस ना? आवाहनं ना जानामी न जानामी तवार्चानं ….. “
“हं , तेही आहेच !”


८व्या – ९ व्या दिवशी जेंव्हा शेवटच्या घरातली आरती होते तेंव्हा मात्र खरंच जाणवत कि बाप्पा ने एकत्र आणलेले आपण सगळे आता पुन्हा आपापल्या आयुष्यात मग्न होणार पुढल्या वर्षी बाप्पा परत येईपर्यत …


२०२०-२०२१ ही
वर्षच या उत्सवाच्या गणतीत नाही. कदाचित त्यामुळेच यंदा हा अनुभव लिहिण्यासाठी वेळ मिळाला.. आता आफ्टर-करोना पुढच्या गणेशोत्सवाच काय स्वरूप असेल तो बाप्पाचं जाणे ..

Author: Pooja Kulkarni

An artist, A Blogger, A Cook , A Gardener & a Mom

Leave a ReplyCancel reply

Discover more from My Passions

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%