तेथे कर माझे जुळती – भाग ३

चौथा टप्पा 

तर आम्ही अखेर आमचा चौथा म्हणजे  शेवटचा डोंगर चढायला सुरुवात केली. आमच्या चढाईतला हा सगळ्यात कठीण भाग होता. हा डोंगर सर्वात निमुळता असल्यामुळे इथल्या पायऱ्या जास्त स्टीप होत्या. त्या शेवटच्या ८०० पायऱ्या चढणं म्हणजे मी आजवर केलेल्या मॅरेथॉन आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंग ची परीक्षा होती. तसं पूर्ण अंतर म्हणाल तर ३६ किलोमीटर अंतर आहे म्हणजे मॅरेथॉन पेक्षा ४ मैल कमीच पण माझ्या एन्ड्युरन्स ची अशी परीक्षा मॅरेथॉन च्या वेळेस पण झाली नव्हती. 

अखेर १२:१५ ला आम्ही तो अखेरचा टप्पा पार केला आणि दत्तशिखरावर पोहोचलो. डोलीवाल्यानी अगस्त्य ला खाली उतरवलं आणि त्यांना त्यांचे पैसे मिळाले. पण त्यांनी सांगितलं कि वर मोबाइलला सक्त मनाई आहे. तसं तिथे लिहिलं देखील होतं. Lपण मी म्हटलं आता वर कोण असणार आहे ? फार फार तर एक भटजी असेल. पण ते दोघेही मला म्हणाले कि वर कायम एक पोलीस तैनात असतो. तुम्ही जर फोटो काढले तर तुमचा फोन जप्त करून पोलीस स्टेशन ला पाठवतात. तेंव्हा तुम्ही उगीच ट्रायल करू नका. आई ला लाइव्ह दर्शन घडवायच होतं पण ते काही शक्य दिसत नव्हत. शेवटी जिथे होतो तिथूनच तिला विडिओ कॉल केला आणि मंदिर दाखवलं. आम्ही सुखरूप पोहोचलो हे बघून तिचा जीव भांड्यात पडला.

आम्ही शेवटी मंदिरात पोहाचलो. जेमतेम १० X १० चा चौथरा .. दत्तगुरूंची संगमरवरी मूर्ती आणि समोर पादुका एवढंच होतं तिथे. त्यासमोर एका मोठ्या खुल्या परातीसारख्या दानपात्रात दक्षिणा ठेवायला जागा होती. शेजारी एक पंडित आणि त्याच्या शेजारी खरोखर एक युनिफॉर्म मध्ये पोलीस होता. त्या ठिकाणी एक विलक्षण भारावून टाकणारं वातावरण होतं. तो अनुभव शब्दात मांडणं खरंच अशक्य आहे. मला असा वाटलं कि मी जगातल्या सगळ्यात सुरक्षित आणि शांत जागी आहे. तशी भावना त्या आधी मी आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती. “PEACE” या शब्दाचा खरा अर्थ मला त्या ठिकाणी कळला. 

“दिव्यत्वाची जेथे प्रचिती  तेथे कर माझे जुळती” अगदी तसेच नकळत हात जोडले गेले. डोळे मिटले गेले.

मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही”

फक्त हेच माझ्या मनात येत होतं आणि तिथून पुढे निघण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. पण छोटी जागा असल्यामुळे तिथे लोकांना जास्त वेळ थांबू देत नाहीत. त्यामुळे आम्ही दक्षिणा ठेवली,प्रदक्षिणा घातली आणि त्या गुरुजींना नमस्कार करून बाहेर आलो.  आईला पुन्हा खालून विडिओ कॉल केला पण माझ्या डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं .. का ते मलाही  कळत नव्हतं. कदाचित मी ४ डोंगर चढून गेले याचा आनंद असेल किंवा तिथे मला जो अनुभव आला त्यामुळे असेल पण आई ला फोन वर एवढच बोलले “आई झालं दर्शन !” पुढे काहीही बोलायला मला सुचत नव्हतं. 

थोडावेळ तिथेच पायऱ्यांवर बसून खाली जाऊ लागलो तर हे दोघे डोली वाले हजरच होते. आता परत खाली जाताना त्यांना नवीन गिऱ्हाईक मिळणं जरा कठीण होतं कारण तिथली गर्दी बरीच कमी होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा गळ घालायला सुरुवात केली. “मैडम आधे पैसे में ले जायेंगे बच्चे को. देख लो वैसे भी हम भी निचे जा ही रहे हैं तो एक बच्चा तो आराम से बैठ के जायेगा” . मी अगस्त्य कडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं .. त्याला तो काय बोलला ते कळलं नसेलही पण त्याने त्या डोलावल्या कडे बघून फक्त “NO” म्हटलं आणि पुढचा विषयच संपला. ते दोघे निघून गेले परत.

ते थोडे पुढे निघून गेल्यावर मग अगस्त्य ला विचारलं तुला काय कळलं ? तर म्हणे “I’ll walk back up but I’ll not sit on that stupid doli again even if they are offering it for free..” खरोखरच त्या डोली वर अर्धवट बसून त्याची पाठ प्रचंड धरली होती.

मग आम्ही खाली अखंडधुनी आणि अन्नछत्राकडे गेलो. तिथेही मोबाईल बंद ठेवून ऐकमेकाशी एकही शब्द नं बोलता जायचं होतं. धुनी वर पुन्हा अंगारा पसरला होता आणि तिथल्या गुरूजींनी आम्हाला अंगारा दिला आम्ही आमच्या ईच्छेने दक्षिणा ठेवली.

श्री गुरू दत्तात्रेय अखंड धुनी

आधी म्हटल्याप्रमाणे सकाळी ७ ते रात्री ७ असा वर्षातले १२ महिने तिथे अन्नदान केलं जातं. मला वाटत होतं की साधा हातावर ठेवण्यासारखा प्रसाद असेल पण आश्चर्य म्हणजे तिथे पूर्ण जेवणाचा प्रसाद होता. ढोकळा, चटणी, भात , आमटी , २ प्रकारच्या भाज्या , पुरी , गोड गव्हाची खीर .. अगदी बफे स्टाईल ! तुम्हाला हवं तेवढं आणि हवं तेवढ्यावेळा खा पण अट मात्र एकच ताटात जे काही घ्याल ते सगळं संपवायचं आणि एक शब्दही न बोलता जेवायचं. तिथे एक माणूस फक्त तुम्ही हे नियम पाळता की नाही ते बघायला होता.

जेवण खरच अप्रतिम होतं. एवढ्या उंचीवर कसं काय दिवसातले १२ तास दररोज ठेवतात हे खरोखर नवल आहे. आणि हे सगळं पूर्णपणे मोफत ! तुम्ही हवं तेवढं दान देऊ शकता पण काहीही देण्याची सक्ती नाही.

जेवण झाल्यावर पुन्हा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. थोडवेळ बसल्यामुळे आणि खाण्यामुळे पाय जड झाले होते.४ डोंगर असले तरीही जाताना ७०% चढण होती आता ७०% उतरती होती. पण चढण्यापेक्षा उतरण्याचा जास्त त्रास होत होता. सूर्य डोक्यावर तळतळू लागला होता आणि आम्ही घामाने भिजलो होतो. 

पण आता हवा साफ होती त्यामुळे रोपवे सुरु झाला असेल याची खात्री होती. त्यामुळे फक्त ५००० पायऱ्याच सर करायच्या होत्या. रोपवे कडे रेस्टरूम ची पण सोय होणारच होती.

साधारण १ तासात आम्ही रोपवे पर्यंत पोहोचलो पण तिथे तेंव्हासुद्धा सगळं सामसूम होतं. तिथे एक माणूस बसला होता. तिथला लोकल असावा. त्याला विचारलं तर तो म्हणाला कि आज खालून कार्स वरच नाही आल्या मग वरून खाली काय जाणार ? म्हणजे हवामान चांगलं होऊन सुध्दा या लोकांनी पूर्ण दिवस सुट्टी घेतली होती. रेस्टरूम मिळण्याची आशा देखील मावळली. आता फक्त स्वतः खाली उतरणं हा एकच ऑपशन होता.

घामामुळे कपडे अंगाला घासून पूर्ण अंगभर  रॅशेस आले होते खासकरून जिथे होऊ नयेत अशा ठिकाणी तर इतके कि माझे पाय दुखत आहेत कि ते रॅशेस हे हि कळत नव्हतं . स्वतःला हाइड्रेटेड ठेवणं खूप गरजेचं होतं त्यामुळे वरून पाणी जात होतं पण शरीरात गेलेलं पाणी बाहेर पडण्याचा घामाव्यतिरिक्त कोणताही स्रोत नव्हता. पण तरीही , आपण काहीतरी करून दाखवलंय हि भावना होती आणि एक समाधान होतं. कदाचित त्यामुळेच मनात एक प्रकारची शांतता होती. मनस्वी आनंद होता. 

साधारण १००० पायऱ्यांवर पोहोचलो तेंव्हा आमच्या ड्राइव्हरला फोन करून ३०-४० मिनिटात खाली यायला सांगितलं. पण शेवटच्या ५०० पायऱ्या त्या तळतळत्या उन्हात  आम्ही कशा सर केल्या ते आमचं आम्हालाच माहित…. शेवटी जेंव्हा गाडीत बसलो तेंव्हा पायच काय शरीराचा कुठलाही भाग सहजपणे हलत नव्हता. आम्ही तिघांनी गिरनार यात्रा पूर्ण केली होती… 

त्या दिवसापर्यंत माझ्या स्वभावाप्रमाणे मी नेहमी खूप चीड चीड करायचे. जे काही माझ्या बाबतीत वाईट घडतं ते माझ्याच बाबतीत का होतंय याचं कारण मी माझ्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये शोधायचे. पण त्या दिवसापासून आज पर्यंत तो “Why me?” प्रश्न मला कधीच पडला नाही. परिस्थिती ला मनापासून मान्य करून पुढे मार्ग शोधण्याऐवजी मी फक्त तक्रार करत असायचे. माझ्या स्वतःशी सुद्धा. त्या दिवसाने मला खरा “Radical Acceptance” शिकवला आणि तो मला या पुढे आयुष्यभर उपयोगी पडणार आहे हे नक्की !

तुम्हाला जर वाटत असेल की हे यात्रावर्णन एका फारच श्रद्धाळू , देवभक्त व्यक्तीने लिहिलं आहे तर तेही अगदीच नाही. आपल्या आयुष्यात कधी कधी नकळत अशा छोट्या छोट्या गोष्टी होऊन जातात कि आपण जर डोळस पणे त्याकडे लक्ष दिलं आणि त्यातला मतितार्थ समजून घेतला तर आपण खरंच आपल्या आयुष्यात फार सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. माझ्या आयुष्यात गेल्या वर्ष , दिड वर्षांपासुन खरोखर मला स्वतःला आश्चर्य वाटेल अशा घटना घडत गेल्या किंबहुना माझ्या कडून त्या घडण्यासाठीची कृती घडत गेली. त्या सगळ्या कृतींची किंवा मिळालेल्या संकेतांची जी फलश्रुती होती ती मला २७ जून २०२२ रोजी अगदी अनपेक्षित रित्या मिळाली.

जय गिरनारी 🙏🏻

तेथे कर माझे जुळती – भाग २

२७ जून २०२२ माझ्या आई बाबांच्या लग्नाचा ५१ वा वाढदिवस. मी , अगस्त्य आणि ओम सकाळी लवकर उठून तयार झालो , नाश्ता केला आणि आमचे ड्राइव्हर आलेच होते त्यामुळे साधारण ७:४० ला आम्ही रोपवे च्या खाली पोहोचलो. हा रोपवे  सकाळी ८ ते संध्याकाळी ४ या वेळातच चालतो आणि प्रत्येक फेरी मध्ये काही ठराविक लोकांनाच वर जाता येतं त्यामुळे जर तुम्ही तिकीट काढलं नसेल तर आधी तिकीटाची रांग आणि मग रोपवे वर चढण्याची रांग यात खूप वेळ जाऊ शकतो. म्हणून आम्ही १५-२० मिनीट आधीच पोहोचलो होतो. सगळं कसं प्लॅन्ड होतं. गिरनार च्या पायथ्याशी जाण्याचा रस्ता खूप सुंदर आहे. समोर दिसणारा भव्य पर्वत आणि त्यावर एका टिम्बासारख दिसणारं दत्त शिखर आम्हाला बोलावत होतं.मला स्वतःला ट्रेकींग करायला खूप आवडतं त्यामुळे मी खूपच उत्साहात होते. 

गिरनारला वर जाण्याआधी पहिल्या पायरी जवळ एक मंदिर आहे तिथे नमस्कार करून आणि पहिल्या पायरी ला नमस्कार करून मगच यात्रा सुरु करावी अशी प्रथा आहे. तर आम्ही पहिल्यांदा तिथे गेलो पायरी ला नमस्कार केला आणि मग रोपवे ला गेलो.

गाडीतून उतरायच्या आतच काही गुजराती मुलं आमच्या ड्राइव्हर शी काहीतरी बोलू लागली. ते सांगत होते कि रोपवे २ दिवस खराब हवामानामुळे बंद आहे. मी म्हटलं कस शक्य आहे . मी काल संध्याकाळी हॉटेल च्या मॅनेजर शी बोलले होते आणि तो मला सांगत होता रोपेवे बद्दल. तो तर काहीच म्हणाला नाही कि रोपवे बंद आहे. म्हणून आम्ही पुन्हा रोपवे च्या सिक्युरिटी गार्डला जाऊन विचारलं… म्हटलं आमच्या तिकिटांचं काय आता ? तर तो म्हणे तुम्ही ऑनलाईन बुक केली आहेत ना तर ऑनलाईन जाऊनच रिफंड घ्यावा लागेल. वर हवा खराब आहे त्यामुळे आम्ही रोपवे च्या कार्स खालून पाठवू शकत नाही. हे सगळं चालल होत गुजराती मधून आणि आमचा ड्राइव्हर आमचा ट्रान्सस्लेटर बनला होता. प्रश्न पैश्यांचा नव्हताच मुळी प्रश्न  हा होता कि रोपवे बंद आहे हे आम्हाला त्यांनी सांगायला हवं होत. शेवटी आम्ही वाद घालणं सोडून दिलं आणि पुढे काय करायचं या बद्दल मुलांशी बोलू लागले. 

खरं तर मी स्वतःच थोडीशी गडबडले होते कारण माझा स्वतःवर कॉन्फिडन्स नव्हता की मी हे पूर्ण चढू शकेन मुलांकडून तर नकार येणार याची मला गॅरंटी होती. पण दोघंही मुलं अगदी सहजपणे म्हणाली चल आपण पूर्ण चढून जाऊ. त्यांनी अस म्हटल्यामुले माझा उत्साह वाढला. अमेरिकेहून इथे फक्त ज्या गोष्टीसाठी आले आहे ती गोष्ट फक्त रोपवे बंद आहे म्हणून सोडून जाणाऱ्यातली मी नव्हते. आईला फोन करून सांगितलं कि आम्ही पूर्ण चढून जातोय.ती आधीच काळजीत होती कि मी एकटी दोन मुलांबरोबर गेले होते .. त्यात आता पूर्ण १०००० पायऱ्या चढून जाणार ? तिने काळजीने देवासमोर जप सुरु केला.  आमचा ड्राइव्हर जरा साशंक होता. तो म्हणे “मॅडम , आप शुअर हो ना कि आप चढ़ सकते हो ?” हे ऐकून पुन्हा धस्स झालं पण म्हटलं जर दत्तगुरूनी मला इथपर्यंत आणलं आहे तर तेच पार करून नेतील.

आम्ही खालून भाड्याने walking support 🦯 cane घेतले. भाड्याने म्हणजे तुम्ही परत आल्यावर जर त्या काठ्या परत केल्या तर ते त्यांचे अर्धे पैसे परत देतात.

एव्हाना आमच्या आजुबाजूला डोली करण्यासाठी लोकांचा गराडा पडला. एयरपोर्ट च्या बाहेर कसे टॅक्सीवाले मागे लागतात अगदी तसेच! त्यांना लक्षात आलं होतं की आमचा परफेक्ट प्लान तेवढ्याच परफेक्टली फसला होता. शिवाय आम्ही पावसाळ्याच्या दिवसात गेलो होतो. लोकं साधारणपणे या दिवसात जात नाहीत कारण हवा खूप गरम असते किंवा खूप पाऊस असतो. तसंच पूर्ण १०००० पायऱ्या चढून जाणारे साधारण रात्री ३-३:३० ला चढाईला सुरुवात करतात म्हणजे दुपारी ऊन डोक्यावर येऊपर्यंत ते परत खाली उतरतात. आमचं सगळंच जगावेगळं चाललं होतं. 

पण एकतर त्या डोली कडे बघून माझा पार्श्वभाग  त्यावर मावेल असं काही वाटत नव्हतं आणि ते आम्हाला काहीही किंमती सांगत होते. त्यांना कसबसं डावलून आम्ही पुन्हा पहिल्या पायरीपर्यंत आलो. गिरनार ला गुरुशिखरा पर्यंत पोहोचण्यासाठी ४ डोंगर सर करून जावे लागतात. रोपवे चालू असता तर आम्हाला त्या पैकी दोनच चढावे लागले असते पण आता आम्हाला मोठा पल्ला गाठायचा होता. 

पहिला टप्पा

जय गिरनारी म्हणून आमचा प्रवास सुरू झाला. ओम आणि अगस्त्य माझ्यापेक्षा दुप्पट वेगाने पुढे निघून गेले पण मी मात्र कदम कदम बढाए जा असं करत एक एक पायरी चढत होते. पाऊस नव्हता पण हवा थंड होती त्यामुळे पहिल्या ५०० पायऱ्या चढणं तसं फार अवघड वाटलं नाही. वरचं दत्त शिखर मात्र ढगांमध्ये दडलं होतं त्यामुळे वरचं फारस काही दिसत नव्हत. 

एक चिवट डोलीवाला कितीही नाकारून सुद्धा रिकामी डोली घेऊन त्याच्या साथादारासोबत माझ्या मागे मागे चढत होता. 

“आप नहीं चढ़ पाओगे.. डोली कर लो .. आपको १-२ घंटे में पहुँचा देंगे”  हे वाक्य १००० पायऱ्यांपर्यंत निदान १५-२० वेळा म्हणून झालं. 

शेवटी मी त्याला म्हटलं “भैय्या मैं ये यात्रा अपने माँ के लिए कर रहीं हूँ ।अगर डोली में बैठी तो उन्हें पुण्य कैसे मिलेगा ? और वैसे भी मुझे रनिंग करने की आदत है,धीरे हि सही चढ़ जाऊंगी |”

त्यावर त्याचं उत्तर तयार होतं “अरे मॅडम वो रनिंग शहर में करती होगी ना? ये पहाड है .. यहाँ चढना सबके बस कि बात नहीं. महाराष्ट्रा से आये हो ना? बॉम्बे से? मैंने सुना आप अपने बेटों से मराठी में बात कर रहे थे और बीच बीच में इंग्लिश में.”

आता हे ऐकून माझी सटकली आणि मी त्याला म्हटलं “भैय्या ,आपको कहा ना मुझे नहीं चाहिये डोली. मैं देख लुंगी जो भी होगा” मी उखडलेले बघून तो तिथे शेजारी एका टपरी वर थांबला. मी पुढे चालत राहिले. 

गिरनार ला साधारण अर्ध्या अंतरावर जैन मंदिर आहे तिथे पर्यंत प्रत्येक २-३ वळणं सोडून छोट्या छोट्या झोपड़ी सारख्या टपऱ्या आहेत. जिथे स्नॅक्स,पाणी, लेमन सोडा मिळतो. साधारण ११०० पायऱ्यावर एका टपरीवर मला अगस्त्य आणि ओम बसलेले दिसले. ओम ठीक होता पण अगस्त्यची बॅटरी पूर्ण डाउन झाली आहे हे मला दिसत होत. हा डोलीवाला परत आला माझ्या मागून आणि त्याच्या मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये अगस्त्य शी बोलू लागला. अगस्त्यच शेवटी म्हणाला कि त्याला डोली हवी आहे आणि त्या डोली वाल्याचा दिवस सफल झाला. अगस्त्यच वजन कमी असल्यामुळे थोडे कमी पैसे लागणार होते.

पण ती डोली म्हणजे एक चौकोनी लाकडी पाट जो कावडीसारखा एका मोठ्या काठीला लटकलेला. त्याला दोन बाजुने दोघे उचलून नेणार शिवाय बसणाऱ्याने अजिबात मागे झुकायचं नाही कारण मागे झुकलं तर तोल जाईल आणि डायरेक्ट दरीत. त्यामुळे ते प्रकरण अगस्त्य ला खूपच अवघड जाणार होतं हे मला कळलं. माझ्या जवळची बॅकपॅक मी अगस्त्यकडे दिली आणि मग मी आणि त्याची डोली अशी वरात पुन्हा चढू लागली.

छोटीशी, वळवळणाची वाट असल्यामुळे समोरून कुणी आलं तर बऱ्याचदा बाजूला उभं राहून जागा द्यावी लागत होती. वाटेत अनेक छोटी छोटी मंदिरं , गुहा आहेत जिथे नवनाथ आणि अनेक साधूनी तपश्चर्या केली होती.  पण आम्हाला फक्त शक्य तेवढं लवकर शिखर गाठायचं होतं त्यामुळे मी कुठेही मध्ये न थांबण्याचा निर्णय घेतला.  साधारण ४००० पायऱ्यांवर एक पाण्याचं कुंड होतं आणि त्याच्या जरा पुढे नेमिनाथ या जैन तीर्थांकाराचं मंदिर आहे.  इथे आम्ही ४ डोंगरांपैकी पहिला डोंगर सर केला होता

दुसरा टप्पा

जैन मंदिराला  पोहोचेपर्यंत सारखं पाणी आणि लेमन सोडा पिऊन रेस्टरूमला जाण्याची मला नितांत गरज होती. खडा डोंगर आणि त्या मध्ये पायऱ्या यात कुठे जाणार? मुलांचं ठीक होतं डोंगर कपारीत आडोसा बघून त्यांचा काम होत होतं पण मी काय करणार? 

जैन मंदिर खूप मोठ आहे त्या परिसरात १५ वेगवेगळ्या जैन तीर्थांकरांची मंदिर आहेत.तिथे आत जाण्याचा विचार केला पण वेळ नको घालवायला म्हणून ती आयडिया ड्रॉप केली. 

न राहवून त्या डोलीवाल्या माणसाला विचारलं  कि इथे बायकांना बाथरूम ची सुविधा आहे का तर तो म्हणाला कि ५००० पायऱ्यावर रोपेवे संपतो तिथे रेस्टरूम्स आहेत. माझा जीव भांड्यात पडला. इथेच अंबाजी मंदिर आहे कशी बशी त्या ५००० पायऱ्या संपल्या आणि रोपवे कडे गेले तर तिथे बॅरिकेड लावून सगळं बंद. म्हणजे जी एकमेव रेस्टरूम होती ती पण बंद होती आता मी काय करू काहीच सुचेना. तसे फारसे लोकही नव्हते. जे भेटले ते मोस्टली उतरत होते.

मग शेवटी बहुतेक त्या डोलीवाल्याला माझी दया आली आणि त्याने तिथे एका टपरी मागे थोडी मोठी ओपन जागा होती तिथे मला सांगितलं कि मी जाऊ शकते. आता २-२:३० तास ५०००+ पायऱ्या चढून माझ्या पायांचा दगड झाला होता त्यात आता तिथे उघड्यावर स्क्वाट करायचं म्हणजे आजवरच्या माझ्या ऑरेंज थेअरी च्या ट्रैनिंगची टेस्ट होती. पण कशीबशी थोडी मोकळी झाले आणि आम्ही पुढे जाऊ लागलो. इथेच आमचा दुसरा डोंगर सर झाला होता.

तिसरा टप्पा

हवा आता थोडी गरम होत होती. वरच्या डोंगरावरचे ढगही बाजूला झाले होते. अजून १००० पायऱ्या चढून गेलो तेवढ्यात ओमने मला हाक मारली. आत्या इथे माझ्या नेक वर मागे काहीतरी आहे. त्याने पटकन ती मधमाशी काढून टाकली आणि मी लगेच मागे गेले आणि त्यातुन डंख काढून टाकला. आता माझ्याकडे कुठलही अँटिसेप्टिक वगैरे नव्हतं .. मी विचारच केला नव्हता कि काही लागेल. त्याच्या मानेवर मागच्या बाजूला मस्त मोठं लाल वर्तुळ तयार झालं होतं. अगस्त्यची डोली पुढे निघून गेली होती आणि आमच्या आजूबाजूला पण कुणी दिसत नव्हत. मी पटकन पाणी लावलं आणि दोघं पटकन त्या डोलीवाल्या पर्यंत पोहोचलो. ते पुढे जाऊन आमच्या साठी थांबले होते. तो डोलीवाला म्हणाला “कुछ नहीं हुआ है।  यहाँ ये हमेशा होता है।” असं म्हणून त्याने शेजारची माती उचलली आणि ओमच्या मानेला लावली. मी म्हटलं “अरे भाई आप मिट्टी लगा रहे हो.. उससे और बिगड़ गया तो ?” तर तो म्हणाला “ अरे मैडम ये यहाँ हमेशा होता है.. देखो अभी ऊपर पहुंचने से पहले ठीक हो जायेगा. यहाँ की मिट्टी में जादू है.अगर उसका डंख अटका होता तो वो भी अपने आप निकल जाता” तसाही माझ्याकडे पर्याय नव्हता. DDLJ मध्ये SRK ने कसं कबूतराला “देश की मिट्टी” लावून बरं केलं होतं ते तसंच काहीसं वाटलं मला 😂 ओम पण म्हणाला कि तो ठीक आहे. म्हणून आम्ही परत चालू लागलो.

आम्ही लवकरच शेवटच्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. माझ्या पोस्टचा जो कव्हर फोटो आहे ना तिथे. तिथे एका बाजूला दत्त शिखरावर जायच्या पायऱ्या आहेत तर दुसरीकडे खाली दत्तधुनी,कमंडलू कुंड  आणि अन्नछत्राकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. 

असं म्हणतात की श्री दत्तात्रेयांनी १२००० वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केली. ते जेंव्हा गिरनार वर आले तेंव्हा तिथे अजिबात पाण्याचा स्रोत नव्हता. दत्त महाराजांनी त्यांचा कमंडलू जोरात तिथे आपटला आणि कुंड तयार होऊन त्यातून गंगा तयार झाली. तेच हे कमंडलू कुंड. त्याच्या शेजारीच दत्तधुनी आहे . 

दत्तधुनी म्हणजे एक मोठा यज्ञासारखा अखंड धगधगता अग्नी आहे जो कधीच शांत होत नाही.दर सोमवारी त्यावरची राख बाजूला करून त्यात थोडी शिधा म्हणजे लाकडं टाकतात आणि तो आपोआप  प्रज्वलित होतो. साधारण सोमवारी सकाळी ९ ते ११ या वेळात अग्नीचं दर्शन घेता येत. आम्ही गेलो तो दिवस पण सोमवार होता आणि आम्हाला ते दर्शन घेता येईल अस वाटत होतं पण ते जर आम्ही सकाळी वेळेत तिथे पोहोचलो असतो तर… रोपवे च्या फिआस्कोमुळे ती संधी हुकली. 

दत्तधुनीच्या शेजारी अन्नछत्र आहे जिथे दररोज सकाळी ७ ते रात्री ७ मोफत अन्नदान केलं जातं. श्री दत्तात्रेयांचा प्रसाद मिळण्याचं हे एकमेव स्थान आहे. आम्ही मूळ प्लॅन प्रमाणे आधी धुनीचं दर्शन घेणार होतो पण आता तसाही उशीर झाला होता त्यामुळे मग पादुकांचं दर्शन घेऊन मग अखंड धुनी दर्शन आणि प्रसाद यासाठी जाऊ असं ठरवलं.

क्रमशः  

तेथे कर माझे जुळती – भाग १

आपल्या आयुष्यात असे काही अनुभव येतात कि त्यामुळे आपल्याही नकळत आपल्या स्वतःमध्ये खूप बदल घडून येतात. यंदा २०२२ साली अगदी योगयोगाने माझ्या आयुष्यात ती १० मिनीटं आली आणि त्यांनी मला एकाप्रकारे पूर्ण बदलून टाकलं.येत्या ७ तारखेला येणाऱ्या दत्तजयंतीच्या निमित्ताने आज माझी ही self revelation ची कहाणी लिहीते आहे.

“गिरनार” श्री दत्तगुरूंचं पवित्र स्थान. आपल्या पैकी अनेकांना ते काय आहे , कुठे आहे माहिती पण नसेल. काहींना ते जैन लोकांचं तीर्थस्थान म्हणून माहिती असेल. पण माझ्यासाठी अगदी लहानपणापासून ते दत्ताचं एक “ultimate pilgrimage” होतं. १०७० मीटर  किंवा ३५०० फूट उंच या पर्वतावर श्री दत्तगुरूंच्या पादुका आहेत. जिथे श्री दत्तगुरूंनी स्वतः तपश्चर्या केली होती.  आणि आजही श्री दत्तगुरूंचा तिथे वास आहे असं म्हटलं जातं. पादुकांपर्यंत पोहोचण्यासाठी ४ डोंगर आणि १०००० पायऱ्या चढून जाव्या लागतात. त्यामुळे जे खूप भाग्यवान आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम आहेत फक्त त्यांनाच ते करण्याची संधी मिळते असं म्हटलं जातं. 

माझे आई आणि बाबा फारच दत्तभक्त होते. मी शाळेत असताना रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावला कि आई बाबा दोघेही दत्ताची गाणी म्हणत असत. रोज ती कानावर पडून मलाही ती पाठ झाली होती. अगदी आजही जर एकदा मी रिविजन  केली तर पूर्ण गाणी मी म्हणू शकते.असो. माझी आई हि नवनाथ या दत्तसंप्रदायातील संतांची पोथी दररोज वाचायची.आजतागायत  मी स्वतः जरी कधीही ती वाचली नसली तरी त्यातील सगळया नवनाथांची आणि त्यांची गिरनार बरोबर असलेल्या कनेक्शनची गोष्ट मी खूप वेळा ऐकली होती. त्यामुळे नकळतच त्या जागी जाण्याची खूप उत्सुकता  होती. 

माझे बाबा खूप लवकर गेले आणि आई बाबांची एकत्र ती यात्रा करण्याची इच्छा अपूर्ण राहिली. पण माझ्या देवभक्त आईला तरी ती यात्रा घडावी अस मला कायम वाटायचं. का कोण जाणे पण बाबा गेल्या नंतर २० वर्ष मी अनेक वेळा भारतात गेले पण या ना त्या कारणाने,आईला गिरनार यात्रा करविण्याचा योग काही जुळून आला नाही. त्यातच दरम्यानच्या काळात तिचं आजारपण आणि औषधं यामुळे क्षीण झालेलं तिचं शरीर यामुळे तिने तर गिरनार यात्रा करण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होईल हि आशाच सोडून दिली होती.  त्यात तिने अनेकांकडून ते कसे अर्धवट यात्रा सोडून परत आले वगैरे कथा ऐकल्या होत्या त्यामुळे जर धडधाकट माणसं ती अर्धवट सोडतात तर मला तर ते शक्यच नाही हे तिने पक्क ठरवलं होत. तिची फिझिकल कंडिशन  पहाता मलाही तेच वाटत होतं पण तरीही तिची हि इच्छा पूर्ण व्हावी असं मनापासून वाटत होतं . 

गेल्या एक , दीड वर्षांपासून मला सतत  गिरनारबद्दल संकेत मिळत होते. कधी कुठला व्हिडीओ  दिसेल , कधी कोणीतरी  व्हॉटसअप वर एखादा लेख पाठवेल ,कधी स्वप्न पडेल असे अनेक संकेत मला मिळत होते. त्यातच गेल्या सप्टेंबर मध्ये माझी माझ्या सगळ्यात लाडक्या मैत्रिणीशी ओळख झाली . तीला इंस्टाग्राम वर भेटणं आणि आमची अगदी लगेचच इतकी घट्ट मैत्री होणं हा पण कदाचित एक संकेतच असेल. पण तिच्याशी जेंव्हा मी सहज बोलले कि मला आईची इच्छा पूर्ण करायची आहे ,तेंव्हा ती पण म्हणाली तू सांग कधी येतेस ते आपण मावशी साठी नक्की अरेंज करू. ते बोलणं झाल आणि कोविड  नंतर पहिल्यांदा जून मध्ये भारतात , दिल्लीला जाण्याचा योग आला. 

माझं भारतात जायचं फ्लाईट होतं शनिवारी आणि त्याच गुरुवारी मला पुन्हा एकदा एक गिरनार यात्रेबद्दलचा एक यु ट्युब व्हिडीओ कुणीतरी फॉरवर्ड केला. तेंव्हा मात्र माझी गिरनार ला जाण्याची इच्छा अधिकच प्रबळ झाली. मी पुन्हा माझ्या मैत्रिणी शी बोलले आणि ती म्हणाली कि तू ये आपण सगळं अरेंज करू. मावशीला शक्य नसेल तर तू जाऊन ये. तिला ते पण खूप समाधान वाटेल. शेवटी तू तिचाच एक भाग आहेस . पण भारतात , एका अनोळखी राज्यात आणि गावात अशी कठीण यात्रा करायला मी एकटी जाणार याला आई तयार होत नव्हती. माझ्या बरोबर कोणीतरी असावं असं तिला वाटत होत. तसा माझ्या बरोबर अगस्त्य- माझा १५ वर्षाचा मुलगा होता पण त्याला pilgrimage ला जायचंय असं सांगितलं असतं तर तो कधीच तयार झाला नसता. तेंव्हा त्याला आणि माझ्या १७ वर्षाच्या भाच्याला , ओम ला, आपण ट्रेकिंग ला जाऊया असं सांगितलं आणि आश्चर्य म्हणजे ते दोघेही माझ्या बरोबर यायला तयार झाले.. मग आमचा लास्ट मिनिट बुकिंग उपक्रम सुरु झाला.

२७ जून ला माझ्या आई बाबांच्या लग्नाचा ५१ वा वाढदिवस होता .. ते घडलं म्हणून मी घडले! त्यामुळे मी आई ला भेट आणि बाबांना श्रध्दांजली म्हणून त्याच दिवशी जायचं ठरवलं. २०२० मध्ये गिरनारला “उडनखटोला” म्हणजे Ropeway सुरू केला आहे तो आपल्याला १/२ अंतरापर्यंत घेऊन जातो त्यामुळे पहिल्यांदा आमची रोप वे ची तिकीटं बूक केली .

मग आम्ही शोधू लागलो जुनागढच्या जवळचं एयरपोर्ट जिथे दिल्ली पासून डायरेक्ट फ्लाईट असेल. राजकोट एयरपोर्ट वर फायनली शिक्कामोर्तब केलं आणि आमचं फ्लाईट आणि हॅाटेल  बुकिंग झालं. माझी मैत्रिण होतीच तिने गाडी आणि ड्रायव्हरची व्यवस्था केली.निघण्याच्या २ दिवस आधी आमची सगळी बुकिंग झाली. एकट्याने भारतातल्या नवीन राज्यात, एका छोट्या गावात तेही देवदर्शनासाठी जाईन असा मी कधी विचारही केला नव्हता पण ते चक्क होत होतं. मनांत थोडी धाकधूक होती पण त्याही पेक्षा गिरनारला जाण्याची एक अनाकलनीय ओढ पण होती.

ठरल्याप्रमाणे २६ जूनला पहाटे आम्ही राजकोटसाठी निघालो.राजकोट एयरपोर्ट एक छोटसं क्युट एयरपोर्ट आहे. पण ते तितकंच बिझी पण आहे. एयरपोर्ट वर आम्ही लगेज बेल्ट पाशी सामानाची वाट बघत होतो तेवढ्यात एक ६०-७० वर्षाचा माणूस अचानक बेल्टवर बेशुध्द पडला.

मग त्याला लगेच स्ट्रेचरवरून घेऊन गेले पण माझ्या मनात उगीचंच शंका की हे असं गुजरात मध्ये आल्या आल्या का व्हावं ? म्हणतात ना “मन चिंती ते वैरी न चिंती” तसं काहीसं ..

आम्हाला ड्रायव्हर मात्र मस्त गप्पीष्ट मिळाला त्यामुळे प्रवास त्यांच्या लोकल गुजराती गोष्टी ऐकत एकदम मजेत झाला. त्याने एका मस्त रेस्टॅारंट मध्ये गुजराती थाळी खायला नेलं. जुनागढच्यापुढे साधारण १०० किलोमीटर वर सोमनाथ हे बारा ज्योतीर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग आहे. आमच्याकडे तो दिवस होता त्यामुळे आम्ही तिथे आधी जाऊन मग जुनागढला रात्री रहायला आलो.

सोमनाथच्या जवळचं भालकातिर्थ आहे जिथे श्रीकृष्णाला  पारध्याचा बाण लागून त्याचा  मानव अवतार संपला. आम्ही तिथे देखील एक धावती भेट देऊन आलो. त्या बद्दल पुन्हा कधीतरी लिहीनच.

पण भारतातल्या कुठल्याही ठिकाणी एक मोठा प्रॅाब्लेम आहे तो म्हणजे स्वच्छ रेस्टरूम्स! बायकांना हा खूपच त्रासदायक प्रकार आहे. ते वगळता भारतात खाण्यापिण्याची जी काही चैन असते ना कि विचारूच नका. मी अमेरीकेत खूप फिरले पण शेवटी आपला देश तो आपला देश ! जगाच्या पाठीवर कुठेही जा शेवटी ती “I belong here!” फिलिंग फक्त भारतातच येते. 

असो ! पण अशाप्रकारे २६ जूनला संध्याकाळी ५-६ च्या सुमारास आम्ही हॅाटेलमध्ये पोहोचलो. दुसऱ्यादिवशी सकाळी ७ ला चहा- नाष्ट्याची  आणि गिरनार ला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करून ठेवली. उद्या आमच्या आयुष्यातला एक unique experience असणार होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी ७ः३० ला आम्ही पूर्ण तयारीनीशी प्रत्येकी २ पाण्याच्या बाटल्या आणि काही स्नॅक्स घेऊन निघालो.८ च्या पहिल्या रोप वे ने ५००० पायऱ्यांपर्यंतचं अंबाजी मंदीरापर्यंत अंतर ३०मिनिटात पार करून पुढे १०ः३० पर्यंत दत्त शिखरावर पोहोचायचं आणि पुन्हा २ः३० पर्यंत परत येऊन रोप वे ने खाली यायचं असा सोप्पा प्लान होता. मुलं तर चढतीलच ५००० पायऱ्या पण मला स्वतःवर पण तेवढा कॅानफिडन्स नक्कीच होता.

पण दत्तगुरूंचा प्लान आमच्यासाठी काही वेगळाच होता. त्याबद्दल पुढच्या भागात… 

जय गिरनारी 🙏🏻

Exit mobile version
%%footer%%