आपल्या आयुष्यात असे काही अनुभव येतात कि त्यामुळे आपल्याही नकळत आपल्या स्वतःमध्ये खूप बदल घडून येतात. यंदा २०२२ साली अगदी योगयोगाने माझ्या आयुष्यात ती १० मिनीटं आली आणि त्यांनी मला एकाप्रकारे पूर्ण बदलून टाकलं.येत्या ७ तारखेला येणाऱ्या दत्तजयंतीच्या निमित्ताने आज माझी ही self revelation ची कहाणी लिहीते आहे.
“गिरनार” श्री दत्तगुरूंचं पवित्र स्थान. आपल्या पैकी अनेकांना ते काय आहे , कुठे आहे माहिती पण नसेल. काहींना ते जैन लोकांचं तीर्थस्थान म्हणून माहिती असेल. पण माझ्यासाठी अगदी लहानपणापासून ते दत्ताचं एक “ultimate pilgrimage” होतं. १०७० मीटर किंवा ३५०० फूट उंच या पर्वतावर श्री दत्तगुरूंच्या पादुका आहेत. जिथे श्री दत्तगुरूंनी स्वतः तपश्चर्या केली होती. आणि आजही श्री दत्तगुरूंचा तिथे वास आहे असं म्हटलं जातं. पादुकांपर्यंत पोहोचण्यासाठी ४ डोंगर आणि १०००० पायऱ्या चढून जाव्या लागतात. त्यामुळे जे खूप भाग्यवान आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम आहेत फक्त त्यांनाच ते करण्याची संधी मिळते असं म्हटलं जातं.
माझे आई आणि बाबा फारच दत्तभक्त होते. मी शाळेत असताना रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावला कि आई बाबा दोघेही दत्ताची गाणी म्हणत असत. रोज ती कानावर पडून मलाही ती पाठ झाली होती. अगदी आजही जर एकदा मी रिविजन केली तर पूर्ण गाणी मी म्हणू शकते.असो. माझी आई हि नवनाथ या दत्तसंप्रदायातील संतांची पोथी दररोज वाचायची.आजतागायत मी स्वतः जरी कधीही ती वाचली नसली तरी त्यातील सगळया नवनाथांची आणि त्यांची गिरनार बरोबर असलेल्या कनेक्शनची गोष्ट मी खूप वेळा ऐकली होती. त्यामुळे नकळतच त्या जागी जाण्याची खूप उत्सुकता होती.
माझे बाबा खूप लवकर गेले आणि आई बाबांची एकत्र ती यात्रा करण्याची इच्छा अपूर्ण राहिली. पण माझ्या देवभक्त आईला तरी ती यात्रा घडावी अस मला कायम वाटायचं. का कोण जाणे पण बाबा गेल्या नंतर २० वर्ष मी अनेक वेळा भारतात गेले पण या ना त्या कारणाने,आईला गिरनार यात्रा करविण्याचा योग काही जुळून आला नाही. त्यातच दरम्यानच्या काळात तिचं आजारपण आणि औषधं यामुळे क्षीण झालेलं तिचं शरीर यामुळे तिने तर गिरनार यात्रा करण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होईल हि आशाच सोडून दिली होती. त्यात तिने अनेकांकडून ते कसे अर्धवट यात्रा सोडून परत आले वगैरे कथा ऐकल्या होत्या त्यामुळे जर धडधाकट माणसं ती अर्धवट सोडतात तर मला तर ते शक्यच नाही हे तिने पक्क ठरवलं होत. तिची फिझिकल कंडिशन पहाता मलाही तेच वाटत होतं पण तरीही तिची हि इच्छा पूर्ण व्हावी असं मनापासून वाटत होतं .
गेल्या एक , दीड वर्षांपासून मला सतत गिरनारबद्दल संकेत मिळत होते. कधी कुठला व्हिडीओ दिसेल , कधी कोणीतरी व्हॉटसअप वर एखादा लेख पाठवेल ,कधी स्वप्न पडेल असे अनेक संकेत मला मिळत होते. त्यातच गेल्या सप्टेंबर मध्ये माझी माझ्या सगळ्यात लाडक्या मैत्रिणीशी ओळख झाली . तीला इंस्टाग्राम वर भेटणं आणि आमची अगदी लगेचच इतकी घट्ट मैत्री होणं हा पण कदाचित एक संकेतच असेल. पण तिच्याशी जेंव्हा मी सहज बोलले कि मला आईची इच्छा पूर्ण करायची आहे ,तेंव्हा ती पण म्हणाली तू सांग कधी येतेस ते आपण मावशी साठी नक्की अरेंज करू. ते बोलणं झाल आणि कोविड नंतर पहिल्यांदा जून मध्ये भारतात , दिल्लीला जाण्याचा योग आला.
माझं भारतात जायचं फ्लाईट होतं शनिवारी आणि त्याच गुरुवारी मला पुन्हा एकदा एक गिरनार यात्रेबद्दलचा एक यु ट्युब व्हिडीओ कुणीतरी फॉरवर्ड केला. तेंव्हा मात्र माझी गिरनार ला जाण्याची इच्छा अधिकच प्रबळ झाली. मी पुन्हा माझ्या मैत्रिणी शी बोलले आणि ती म्हणाली कि तू ये आपण सगळं अरेंज करू. मावशीला शक्य नसेल तर तू जाऊन ये. तिला ते पण खूप समाधान वाटेल. शेवटी तू तिचाच एक भाग आहेस . पण भारतात , एका अनोळखी राज्यात आणि गावात अशी कठीण यात्रा करायला मी एकटी जाणार याला आई तयार होत नव्हती. माझ्या बरोबर कोणीतरी असावं असं तिला वाटत होत. तसा माझ्या बरोबर अगस्त्य- माझा १५ वर्षाचा मुलगा होता पण त्याला pilgrimage ला जायचंय असं सांगितलं असतं तर तो कधीच तयार झाला नसता. तेंव्हा त्याला आणि माझ्या १७ वर्षाच्या भाच्याला , ओम ला, आपण ट्रेकिंग ला जाऊया असं सांगितलं आणि आश्चर्य म्हणजे ते दोघेही माझ्या बरोबर यायला तयार झाले.. मग आमचा लास्ट मिनिट बुकिंग उपक्रम सुरु झाला.
२७ जून ला माझ्या आई बाबांच्या लग्नाचा ५१ वा वाढदिवस होता .. ते घडलं म्हणून मी घडले! त्यामुळे मी आई ला भेट आणि बाबांना श्रध्दांजली म्हणून त्याच दिवशी जायचं ठरवलं. २०२० मध्ये गिरनारला “उडनखटोला” म्हणजे Ropeway सुरू केला आहे तो आपल्याला १/२ अंतरापर्यंत घेऊन जातो त्यामुळे पहिल्यांदा आमची रोप वे ची तिकीटं बूक केली .
मग आम्ही शोधू लागलो जुनागढच्या जवळचं एयरपोर्ट जिथे दिल्ली पासून डायरेक्ट फ्लाईट असेल. राजकोट एयरपोर्ट वर फायनली शिक्कामोर्तब केलं आणि आमचं फ्लाईट आणि हॅाटेल बुकिंग झालं. माझी मैत्रिण होतीच तिने गाडी आणि ड्रायव्हरची व्यवस्था केली.निघण्याच्या २ दिवस आधी आमची सगळी बुकिंग झाली. एकट्याने भारतातल्या नवीन राज्यात, एका छोट्या गावात तेही देवदर्शनासाठी जाईन असा मी कधी विचारही केला नव्हता पण ते चक्क होत होतं. मनांत थोडी धाकधूक होती पण त्याही पेक्षा गिरनारला जाण्याची एक अनाकलनीय ओढ पण होती.
ठरल्याप्रमाणे २६ जूनला पहाटे आम्ही राजकोटसाठी निघालो.राजकोट एयरपोर्ट एक छोटसं क्युट एयरपोर्ट आहे. पण ते तितकंच बिझी पण आहे. एयरपोर्ट वर आम्ही लगेज बेल्ट पाशी सामानाची वाट बघत होतो तेवढ्यात एक ६०-७० वर्षाचा माणूस अचानक बेल्टवर बेशुध्द पडला.
मग त्याला लगेच स्ट्रेचरवरून घेऊन गेले पण माझ्या मनात उगीचंच शंका की हे असं गुजरात मध्ये आल्या आल्या का व्हावं ? म्हणतात ना “मन चिंती ते वैरी न चिंती” तसं काहीसं ..
आम्हाला ड्रायव्हर मात्र मस्त गप्पीष्ट मिळाला त्यामुळे प्रवास त्यांच्या लोकल गुजराती गोष्टी ऐकत एकदम मजेत झाला. त्याने एका मस्त रेस्टॅारंट मध्ये गुजराती थाळी खायला नेलं. जुनागढच्यापुढे साधारण १०० किलोमीटर वर सोमनाथ हे बारा ज्योतीर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग आहे. आमच्याकडे तो दिवस होता त्यामुळे आम्ही तिथे आधी जाऊन मग जुनागढला रात्री रहायला आलो.
सोमनाथच्या जवळचं भालकातिर्थ आहे जिथे श्रीकृष्णाला पारध्याचा बाण लागून त्याचा मानव अवतार संपला. आम्ही तिथे देखील एक धावती भेट देऊन आलो. त्या बद्दल पुन्हा कधीतरी लिहीनच.
पण भारतातल्या कुठल्याही ठिकाणी एक मोठा प्रॅाब्लेम आहे तो म्हणजे स्वच्छ रेस्टरूम्स! बायकांना हा खूपच त्रासदायक प्रकार आहे. ते वगळता भारतात खाण्यापिण्याची जी काही चैन असते ना कि विचारूच नका. मी अमेरीकेत खूप फिरले पण शेवटी आपला देश तो आपला देश ! जगाच्या पाठीवर कुठेही जा शेवटी ती “I belong here!” फिलिंग फक्त भारतातच येते.
असो ! पण अशाप्रकारे २६ जूनला संध्याकाळी ५-६ च्या सुमारास आम्ही हॅाटेलमध्ये पोहोचलो. दुसऱ्यादिवशी सकाळी ७ ला चहा- नाष्ट्याची आणि गिरनार ला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करून ठेवली. उद्या आमच्या आयुष्यातला एक unique experience असणार होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७ः३० ला आम्ही पूर्ण तयारीनीशी प्रत्येकी २ पाण्याच्या बाटल्या आणि काही स्नॅक्स घेऊन निघालो.८ च्या पहिल्या रोप वे ने ५००० पायऱ्यांपर्यंतचं अंबाजी मंदीरापर्यंत अंतर ३०मिनिटात पार करून पुढे १०ः३० पर्यंत दत्त शिखरावर पोहोचायचं आणि पुन्हा २ः३० पर्यंत परत येऊन रोप वे ने खाली यायचं असा सोप्पा प्लान होता. मुलं तर चढतीलच ५००० पायऱ्या पण मला स्वतःवर पण तेवढा कॅानफिडन्स नक्कीच होता.
पण दत्तगुरूंचा प्लान आमच्यासाठी काही वेगळाच होता. त्याबद्दल पुढच्या भागात…
जय गिरनारी 🙏🏻
