तेथे कर माझे जुळती – भाग ३

चौथा टप्पा 

तर आम्ही अखेर आमचा चौथा म्हणजे  शेवटचा डोंगर चढायला सुरुवात केली. आमच्या चढाईतला हा सगळ्यात कठीण भाग होता. हा डोंगर सर्वात निमुळता असल्यामुळे इथल्या पायऱ्या जास्त स्टीप होत्या. त्या शेवटच्या ८०० पायऱ्या चढणं म्हणजे मी आजवर केलेल्या मॅरेथॉन आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंग ची परीक्षा होती. तसं पूर्ण अंतर म्हणाल तर ३६ किलोमीटर अंतर आहे म्हणजे मॅरेथॉन पेक्षा ४ मैल कमीच पण माझ्या एन्ड्युरन्स ची अशी परीक्षा मॅरेथॉन च्या वेळेस पण झाली नव्हती. 

अखेर १२:१५ ला आम्ही तो अखेरचा टप्पा पार केला आणि दत्तशिखरावर पोहोचलो. डोलीवाल्यानी अगस्त्य ला खाली उतरवलं आणि त्यांना त्यांचे पैसे मिळाले. पण त्यांनी सांगितलं कि वर मोबाइलला सक्त मनाई आहे. तसं तिथे लिहिलं देखील होतं. Lपण मी म्हटलं आता वर कोण असणार आहे ? फार फार तर एक भटजी असेल. पण ते दोघेही मला म्हणाले कि वर कायम एक पोलीस तैनात असतो. तुम्ही जर फोटो काढले तर तुमचा फोन जप्त करून पोलीस स्टेशन ला पाठवतात. तेंव्हा तुम्ही उगीच ट्रायल करू नका. आई ला लाइव्ह दर्शन घडवायच होतं पण ते काही शक्य दिसत नव्हत. शेवटी जिथे होतो तिथूनच तिला विडिओ कॉल केला आणि मंदिर दाखवलं. आम्ही सुखरूप पोहोचलो हे बघून तिचा जीव भांड्यात पडला.

आम्ही शेवटी मंदिरात पोहाचलो. जेमतेम १० X १० चा चौथरा .. दत्तगुरूंची संगमरवरी मूर्ती आणि समोर पादुका एवढंच होतं तिथे. त्यासमोर एका मोठ्या खुल्या परातीसारख्या दानपात्रात दक्षिणा ठेवायला जागा होती. शेजारी एक पंडित आणि त्याच्या शेजारी खरोखर एक युनिफॉर्म मध्ये पोलीस होता. त्या ठिकाणी एक विलक्षण भारावून टाकणारं वातावरण होतं. तो अनुभव शब्दात मांडणं खरंच अशक्य आहे. मला असा वाटलं कि मी जगातल्या सगळ्यात सुरक्षित आणि शांत जागी आहे. तशी भावना त्या आधी मी आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती. “PEACE” या शब्दाचा खरा अर्थ मला त्या ठिकाणी कळला. 

“दिव्यत्वाची जेथे प्रचिती  तेथे कर माझे जुळती” अगदी तसेच नकळत हात जोडले गेले. डोळे मिटले गेले.

मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही”

फक्त हेच माझ्या मनात येत होतं आणि तिथून पुढे निघण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. पण छोटी जागा असल्यामुळे तिथे लोकांना जास्त वेळ थांबू देत नाहीत. त्यामुळे आम्ही दक्षिणा ठेवली,प्रदक्षिणा घातली आणि त्या गुरुजींना नमस्कार करून बाहेर आलो.  आईला पुन्हा खालून विडिओ कॉल केला पण माझ्या डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं .. का ते मलाही  कळत नव्हतं. कदाचित मी ४ डोंगर चढून गेले याचा आनंद असेल किंवा तिथे मला जो अनुभव आला त्यामुळे असेल पण आई ला फोन वर एवढच बोलले “आई झालं दर्शन !” पुढे काहीही बोलायला मला सुचत नव्हतं. 

थोडावेळ तिथेच पायऱ्यांवर बसून खाली जाऊ लागलो तर हे दोघे डोली वाले हजरच होते. आता परत खाली जाताना त्यांना नवीन गिऱ्हाईक मिळणं जरा कठीण होतं कारण तिथली गर्दी बरीच कमी होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा गळ घालायला सुरुवात केली. “मैडम आधे पैसे में ले जायेंगे बच्चे को. देख लो वैसे भी हम भी निचे जा ही रहे हैं तो एक बच्चा तो आराम से बैठ के जायेगा” . मी अगस्त्य कडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं .. त्याला तो काय बोलला ते कळलं नसेलही पण त्याने त्या डोलावल्या कडे बघून फक्त “NO” म्हटलं आणि पुढचा विषयच संपला. ते दोघे निघून गेले परत.

ते थोडे पुढे निघून गेल्यावर मग अगस्त्य ला विचारलं तुला काय कळलं ? तर म्हणे “I’ll walk back up but I’ll not sit on that stupid doli again even if they are offering it for free..” खरोखरच त्या डोली वर अर्धवट बसून त्याची पाठ प्रचंड धरली होती.

मग आम्ही खाली अखंडधुनी आणि अन्नछत्राकडे गेलो. तिथेही मोबाईल बंद ठेवून ऐकमेकाशी एकही शब्द नं बोलता जायचं होतं. धुनी वर पुन्हा अंगारा पसरला होता आणि तिथल्या गुरूजींनी आम्हाला अंगारा दिला आम्ही आमच्या ईच्छेने दक्षिणा ठेवली.

श्री गुरू दत्तात्रेय अखंड धुनी

आधी म्हटल्याप्रमाणे सकाळी ७ ते रात्री ७ असा वर्षातले १२ महिने तिथे अन्नदान केलं जातं. मला वाटत होतं की साधा हातावर ठेवण्यासारखा प्रसाद असेल पण आश्चर्य म्हणजे तिथे पूर्ण जेवणाचा प्रसाद होता. ढोकळा, चटणी, भात , आमटी , २ प्रकारच्या भाज्या , पुरी , गोड गव्हाची खीर .. अगदी बफे स्टाईल ! तुम्हाला हवं तेवढं आणि हवं तेवढ्यावेळा खा पण अट मात्र एकच ताटात जे काही घ्याल ते सगळं संपवायचं आणि एक शब्दही न बोलता जेवायचं. तिथे एक माणूस फक्त तुम्ही हे नियम पाळता की नाही ते बघायला होता.

जेवण खरच अप्रतिम होतं. एवढ्या उंचीवर कसं काय दिवसातले १२ तास दररोज ठेवतात हे खरोखर नवल आहे. आणि हे सगळं पूर्णपणे मोफत ! तुम्ही हवं तेवढं दान देऊ शकता पण काहीही देण्याची सक्ती नाही.

जेवण झाल्यावर पुन्हा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. थोडवेळ बसल्यामुळे आणि खाण्यामुळे पाय जड झाले होते.४ डोंगर असले तरीही जाताना ७०% चढण होती आता ७०% उतरती होती. पण चढण्यापेक्षा उतरण्याचा जास्त त्रास होत होता. सूर्य डोक्यावर तळतळू लागला होता आणि आम्ही घामाने भिजलो होतो. 

पण आता हवा साफ होती त्यामुळे रोपवे सुरु झाला असेल याची खात्री होती. त्यामुळे फक्त ५००० पायऱ्याच सर करायच्या होत्या. रोपवे कडे रेस्टरूम ची पण सोय होणारच होती.

साधारण १ तासात आम्ही रोपवे पर्यंत पोहोचलो पण तिथे तेंव्हासुद्धा सगळं सामसूम होतं. तिथे एक माणूस बसला होता. तिथला लोकल असावा. त्याला विचारलं तर तो म्हणाला कि आज खालून कार्स वरच नाही आल्या मग वरून खाली काय जाणार ? म्हणजे हवामान चांगलं होऊन सुध्दा या लोकांनी पूर्ण दिवस सुट्टी घेतली होती. रेस्टरूम मिळण्याची आशा देखील मावळली. आता फक्त स्वतः खाली उतरणं हा एकच ऑपशन होता.

घामामुळे कपडे अंगाला घासून पूर्ण अंगभर  रॅशेस आले होते खासकरून जिथे होऊ नयेत अशा ठिकाणी तर इतके कि माझे पाय दुखत आहेत कि ते रॅशेस हे हि कळत नव्हतं . स्वतःला हाइड्रेटेड ठेवणं खूप गरजेचं होतं त्यामुळे वरून पाणी जात होतं पण शरीरात गेलेलं पाणी बाहेर पडण्याचा घामाव्यतिरिक्त कोणताही स्रोत नव्हता. पण तरीही , आपण काहीतरी करून दाखवलंय हि भावना होती आणि एक समाधान होतं. कदाचित त्यामुळेच मनात एक प्रकारची शांतता होती. मनस्वी आनंद होता. 

साधारण १००० पायऱ्यांवर पोहोचलो तेंव्हा आमच्या ड्राइव्हरला फोन करून ३०-४० मिनिटात खाली यायला सांगितलं. पण शेवटच्या ५०० पायऱ्या त्या तळतळत्या उन्हात  आम्ही कशा सर केल्या ते आमचं आम्हालाच माहित…. शेवटी जेंव्हा गाडीत बसलो तेंव्हा पायच काय शरीराचा कुठलाही भाग सहजपणे हलत नव्हता. आम्ही तिघांनी गिरनार यात्रा पूर्ण केली होती… 

त्या दिवसापर्यंत माझ्या स्वभावाप्रमाणे मी नेहमी खूप चीड चीड करायचे. जे काही माझ्या बाबतीत वाईट घडतं ते माझ्याच बाबतीत का होतंय याचं कारण मी माझ्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये शोधायचे. पण त्या दिवसापासून आज पर्यंत तो “Why me?” प्रश्न मला कधीच पडला नाही. परिस्थिती ला मनापासून मान्य करून पुढे मार्ग शोधण्याऐवजी मी फक्त तक्रार करत असायचे. माझ्या स्वतःशी सुद्धा. त्या दिवसाने मला खरा “Radical Acceptance” शिकवला आणि तो मला या पुढे आयुष्यभर उपयोगी पडणार आहे हे नक्की !

तुम्हाला जर वाटत असेल की हे यात्रावर्णन एका फारच श्रद्धाळू , देवभक्त व्यक्तीने लिहिलं आहे तर तेही अगदीच नाही. आपल्या आयुष्यात कधी कधी नकळत अशा छोट्या छोट्या गोष्टी होऊन जातात कि आपण जर डोळस पणे त्याकडे लक्ष दिलं आणि त्यातला मतितार्थ समजून घेतला तर आपण खरंच आपल्या आयुष्यात फार सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. माझ्या आयुष्यात गेल्या वर्ष , दिड वर्षांपासुन खरोखर मला स्वतःला आश्चर्य वाटेल अशा घटना घडत गेल्या किंबहुना माझ्या कडून त्या घडण्यासाठीची कृती घडत गेली. त्या सगळ्या कृतींची किंवा मिळालेल्या संकेतांची जी फलश्रुती होती ती मला २७ जून २०२२ रोजी अगदी अनपेक्षित रित्या मिळाली.

जय गिरनारी 🙏🏻

Exit mobile version
%%footer%%