Laxman Rekha

कोविडनंतर च्या काळात अनिता आणि तिचा नवरा राघव दोघेही  १००% वर्क फ्रॉम होम होते त्यामुळे सकाळी  ऑफिससाठी तयार होऊन वेळेत निघायची एक घाई कमी होती. पण दोन मुलांचा नाश्ता आणि लंच बॉक्स बनवणं आणि त्यांना वेळेत शाळेत सोडणं हि रोजची कसरत असायची. अमेरिकेत स्थायिक होऊन त्यांना १०-१२ वर्ष झाली होती त्यामुळे सगळी कामं स्वतःच्या स्वतः करणं हे पण अंगवळणी पडलं होतं. 

अगदी नेहमी सारखाच तसाच एक “वीकडे” होता.आदल्या दिवशी च्या पार्टीमुळे अनिता ला झोपायला उशीर झाला होता. पण शाळेत तर पाठवायला पाहिजेच ना मुलांना ? त्यामुळे मनात नसताना पण अनिता ने स्वतःला बेडमधून  बाहेर काढलं. स्वतःच आवरून मुलांना उठवलं आणि किचन मध्ये ब्रेकफास्ट / लंच बनवायला गेली. १५-२० मिनिटं हाका मारल्यावर दोन्ही मुलं शेवटी टेबलवर आली . अथर्व खुश झाला कारण आज त्याला मूड होता पॅनकेक खाण्याचा पण रेवा  मात्र वैतागली कारण तिने कालच शाळेत कुठल्या तरी इव्हेंट ला खूप पॅनकेक खाल्ले होते आणि तिला अजिबात तेच तेच खायच नव्हत. 

राघव पण मग म्हणाला “अनिता तिला काय हवं ते दे ना . कशाला सकाळी सकाळी तिचा मूड ऑफ करतेस? माझ इथे ऑफिसच काम चालू आहे तुला शांतता आवडतंच नाही का ?” 

हे ऐकून रेवा चे tantrum अजूनच वाढले. शेवटी उशीर व्हायला लागला म्हणून अनिताने तिला hash browns करून दिले आणि ती शांत झाली.  दोघांना शेवटी तयार करून गाडीत घातल आणि अनिता त्यांना शाळेत सोडून आली. हे सगळं होताना तिला बरेच ऑफिस चे मेसेजेस येत होते सगळ्या गडबडीत अनिताने त्यांच्या कडे बघितलं पण नाही. त्यामुळे आता पटकन ऑफिसच्या कामाला लागणं गरजेचं होतं. आज लंच पण तिने काम करता करता डेस्क समोरच घेतला. संध्याकाळी ६ ला  अथर्वची स्विमिंग मीट होती त्यामुळे तिकडे जायचा होतं. त्याआधी घरी स्वयंपाक करून जायचा होतं  कारण रात्री परत यायला ९ वाजणार होते. हे सगळं कमी म्हणून कि काय  तिच्या बॉसने तिला ४ वाजता एक urgent presentation करायला सांगितलं.

आता ते रात्री बघू असं ठरवून अनिता ने घाई घाई मध्ये स्वयंपाक केला आणि अथर्व च्या मीटला वेळेत पोहोचली. रात्री ९ वाजता ते परत आले तेंव्हा रेवाला खूप भूक लागली होती त्यामुळे तिने पटकन जेवायला वाढलं मुलाना झोपवल. रात्री १० वाजता शेवटी तिला शांत वेळ मिळाला पण presentation  बाकी होतं.ते करणं गरजेचं होतं.  ते पूर्ण करून झोपायला जायला तिला १२:३० झाले. पण ती एवढी थकली होती कि तिला झोप लागेना. शेजारी राघव मात्र गाढ झोपला होता. 

तिच्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं. काय चुकतंय माझं ? का माझ्या घरातलं कुणीच खुश नाहीये? मुलांना असं वाटतं कि आई नेहमीच बिझी असते ,नवरा म्हणतो कि मी कायम दमलेलीच असते. खऱय का हे ? पण मी तर सगळंच करते मनापासून … मग मला का एवढं डिप्रेसिंग वाटतंय ? असं वाटतंय कि या जगात मी एकटी आहे. मुलांचं करण त्यांच्या वेळा पाळणं हे फक्त माझंच काम का आहे? राघव पण त्यांना शाळेत सोडू शकतो ना ? तो रेवा ला जेवायला वाढू शकत होता ना ? त्याने ते का नाही केलं ? 

तिने ठरवलं कि या बाबतीत कुणाशी तरी बोलायचं.. कुणीच नाही तर गुगल बाबाला तरी विचारूच ! या विचारात तिला रात्री १:३० – २ ला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी ऑफिसच्या महत्वाच्या मीटिंग झाल्यावर तिने थोडा research केला. 

“Why am I feeling so tired and not interested in anything?”

 खूप results आले गूगल वर पण एका आर्टिकल मध्ये काही लिहिलं होतं ते तिला अगदी मनापासून पटलं. असं वाटलं कि तिच्या आयुष्याच्या घटनांचं वर्णन केलंय त्यात. तिथे त्या author ची information होती. त्या लेखकाने लिहिलेली काही पुस्तकं होती. त्यातल्या एका पुस्तकाचा excerpt तिला खूपच आवडला. तिने लगेच ऍमेझॉन वर ते पुस्तक ऑर्डर केलं. दिवस जात होते पण जसं जस ती ते पुस्तक वाचत होती तसं तसं तिला तिच्या आयुष्याचा आणि तिच्या अनुभवांचा उलगडा झाल्यासारखा वाटत होतं. त्या पुस्तकाचा विषय होता “Boundaries” म्हणजेच  “लक्ष्मणरेषा” . 

खरं तर “लक्ष्मणरेषा ” हा शब्द ऐकल्यावर नकळत आपल्या डोळ्यासमोर येते ती अरण्यात एका झोपडीमध्ये असलेली सीता आणि तिच्या समोर लक्ष्मण रेषेपलीकडे असलेला साधूच्या वेशातला रावण !  आपल्याला आठवते ती आपली शिकवण “अतिथी देवो भव” जिला प्रत्यक्ष सीता माई पण भुलली आणि तिने लक्ष्मण रेषा पार केली. आपल्या आयुष्यात पण अशा कितीतरी रेषा किंवा मर्यादा असतात ज्या समाजाने आणि परंपरेने आपल्यावर घातलेल्या असतात आणि आपण आपलं संपूर्ण आयुष्य अगदी मनापासून त्या मर्यादांचं पालन करत राहतो. 

पण या सर्व सामाजिक मर्यादांपुढे एक महत्वाची “लक्ष्मण रेषा” मात्र आपण विसरतो आणि ती म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची ! स्वतः च्या स्वाभिमानाची ! आपण सामाजिक मर्यादांच्या आणि रीती भातींच्या कचाट्यात असे काही अडकतो की आपल्याला बहुतांश वेळा कळतही नाही कि आपल्या स्वतःच्या भोवती आपण कधी लक्ष्मणरेषा आखलीच नाहीये. 

अनिताचं पण नेमकं हेच झालं. एक चांगली आई , चांगली बायको आणि चांगली गृहिणी होण्याच्या नादात ती स्वतःचं स्वत्वच विसरून गेली होती. का बरं एकही दिवस असा नसावा कि ज्या दिवशी ती उशिरा उठलीये आणि तिच्या ऐवजी राघव ने मुलांना शाळे साठी तयार केलंय आणि त्यांना शाळेत सोडलंय? का बरं कायम मुलांना खुश ठेवणं त्यांच्या वेळा पाळणं हे तिचच काम आहे? कुठे लिहून ठेवलय कि आईनेच स्वयंपाक करावा , घरकाम करावं , रीतीभाती सांभाळाव्या , मुलांसाठी ड्राइवर व्हावं ? ती पण जवळ जवळ राघव एवढाच कमावते मग या संसाराच्या जबाबदाऱ्या समसमान का बरं नाहीत ? की, तिने कधीच त्या तशा होऊ दिल्या नाहीत ? राघव ची चिडचिड नको. सासरच्यांचे टोमणे नकोत , मित्रमंडळीमध्ये घराची शोभा नको म्हणून कायम तीच स्वतःला बदलत राहिली. तिने स्वतः भोवती कधीच ती लक्ष्मण रेषा आखली नाही. तिच्या मनातली सगळी शंकेची जळमटं ते पुस्तक वाचून अचानक दूर झाली. तिने ठरवलं स्वतःला बदलायचं..  

“Establishing boundaries is not being selfish” हा सगळ्यात मोठा धडा तिला मिळाला. जशी आपल्या  घराभोवती किंवा देशाभोवती boundary असते तशीच आपलं स्वत्व जपायला आपल्यालाही फक्त स्वतःची एक लक्ष्मणरेषा आवश्यक असते.  ती लक्ष्मणरेषा आपण स्वतःच निर्माण करायची असते आणि स्वतःच ती जपायची पणअसते.

Author: Pooja Kulkarni

An artist, A Blogger, A Cook , A Gardener & a Mom

Discover more from My Passions

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%